Police Bharti Ground Practice: चंद्रपुरात खाकीच्या स्वप्नासाठी तरुणांचा घाम; पहाटेपासूनच मैदानी चाचणीचा कसून सराव

Bhairav Diwase
चंद्रपूर:- खाकी वर्दी घालण्याचं आणि देशाची, राज्याची सेवा करण्याचं स्वप्न प्रत्येक तरुणाच्या मनात असतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता चंद्रपूरमधील युवक आणि युवतींनी कंबर कसली आहे. आगामी पोलीस भरती डोळ्यांसमोर ठेवून चंद्रपूर जिल्हा स्टेडियमवर सध्या तरुणाईचा जोरदार सराव पाहायला मिळत आहे.

चंद्रपूरच्या जिल्हा स्टेडियमवर सध्या एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळत आहे. निमित्त आहे येणाऱ्या पोलीस भरतीचे! खाकीचे स्वप्न उराशी बाळगून शेकडो विद्यार्थी सकाळच्या कोवळ्या उन्हात मैदानात उतरले आहेत. धावणे, गोळाफेक अशा मैदानी चाचण्यांसाठी विद्यार्थ्यांचा सराव अगदी कसून सुरू आहे.


सकाळच्या ५ वाजतापासूनच जिल्हा स्टेडियमवर विद्यार्थ्यांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. यामध्ये अनेक फिजिकल अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुभवी प्रशिक्षकांकडून विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. मैदानी चाचणीत एक-एक गुण महत्त्वाचा असतो, त्यामुळे बारीक-सारीक चुका कशा टाळायच्या, यावर प्रशिक्षकांकडून भर दिला जात आहे.


मागच्या भरतीत विद्यार्थ्यांचे काही गुणांनी सिलेक्शन हुकलं होतं. त्या अपयशाची चव खूप कडू होती, पण विद्यार्थी खचले नाही. यावेळेस चुका सुधारून, नव्या दमाने आणि पूर्ण ताकदीने विद्यार्थी मैदानात उतरलो आहे. यावेळी खाकी मिळवायचीच, असा निर्धार विद्यार्थ्यांनी आहे.


विशेष म्हणजे, या सरावा दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये थकवा नाही तर एक वेगळाच आनंद आणि उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. मागील भरतीत अपयश आलेले अनुभवी उमेदवार आणि पहिल्यांदाच नशीब आजमावणारे नवखे विद्यार्थी एकत्र मिळून इथे घाम गाळत आहेत. प्रत्येकाचे ध्येय एकच आहे – अंगावर खाकी वर्दी चढवणे! आगामी काळात होणाऱ्या या भरतीसाठी चंद्रपूरची ही तरुणाई आता पूर्णपणे सज्ज झाली आहे.