पोंभुर्णा:- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, देवई (ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) येथे मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी भव्य 'प्रवेशोत्सव व पालक मेळावा' अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. मा. अप्पर आयुक्त, नागपूर यांच्या प्रेरणेने आणि प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेत दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे यावेळी पारंपरिक पद्धतीने व ढोल-ताशांच्या गजात उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पोंभुर्णा पंचायत समितीच्या माजी सभापती अल्का आत्राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास मेश्राम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
या प्रसंगी क.शि.वि. अधिकारी वाय. आर. चव्हाण आणि वरिष्ठ लिपीक सचिन वानखेडे यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शैक्षणिक साहित्य वाटप आणि गुणवंतांचा गौरव
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना आकर्षक पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पालक मेळाव्यात संवाद
प्रवेशोत्सवासोबतच आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेविषयी सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षकांमध्ये कसा योग्य समन्वय असावा, यावर उपस्थित मान्यवरांनी आणि शिक्षकांनी पालकांशी संवाद साधला. पालकांनीही शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत आपले विचार मांडले.
यशस्वी नियोजन आणि सांगता
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मुख्याध्यापक डी. सी. शिंपी यांच्या नेतृत्वात शाळेच्या अधीक्षिका, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी अतिशय नेटकेपणाने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंगडे सर यांनी केले, तर शेवटी श ठाकरे सर यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे, पालकांचे आणि नागरिकांचे आभार मानले. आभार प्रदर्शन झाल्यानंतर राष्ट्रगीताने या यशस्वी आणि उत्साहवर्धक कार्यक्रमाची सांगता झाली.

