चंद्रपूर:- चंद्रपूर महापालिकेतील सहा स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दि१ जुलैला तात्पुरती स्थगिती दिली आहे. काँग्रेसमधील गटनेतेपदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने ३ जुलै रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यातील विषय क्र. २२ वर स्थगिती दिली. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया तूर्तास थांबली असून महापालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
३ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सहा स्वीकृत सदस्यांची निवड होणार होती. विद्यमान संख्याबळानुसार काँग्रेसला तीन, भाजपला दोन आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला एक सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे विविध पक्षांमध्ये इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू होते.
मात्र काँग्रेसमधील गटनेतेपदाचा वाद न्यायप्रविष्ट असताना स्वीकृत सदस्य निवडीचा विषय सभेपुढे आणण्यास धानोरकर समर्थक नगरसेवकांनी विरोध केला होता. काँग्रेसचे तत्कालीन गटनेते राजेश अडूर यांना पदावरून हटवून सुरेंद्र अडबाले यांना गटनेते म्हणून विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली होती. मात्र या निर्णयाला राजेश अडूर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या आदेशालाच स्थगिती दिली. त्यामुळे सध्या राजेश अडूर यांच्याकडेच गटनेतेपद कायम आहे.
स्वीकृत सदस्य निवडीचा विषय अजेंड्यातून वगळण्याची मागणी प्रशासनाने मान्य न केल्याने धानोरकर समर्थक नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याचिकेची दखल घेत अजेंड्यातील विषय क्र. २२ वर तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे स्वीकृत सदस्यांची निवड न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत लांबणीवर पडली आहे.
या निर्णयामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार समर्थक आणि खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे आता महापालिका प्रशासन, इच्छुक उमेदवार आणि सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

