Ballarpur Accident News: धावत्या बसवर कोसळले झाड; चालकाच्या एका ब्रेकमुळे वाचले ४० प्रवाशांचे प्राण!

Bhairav Diwase
बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात गुरुवारी एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. चंद्रपूरहून आदिलाबादकडे जाणाऱ्या तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या (TSRTC) एका प्रवासी बसवर अचानक एक झाड कोसळले. या अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी स्वार होते. झाड कोसळल्याने बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले असून, झाडाच्या फांद्या काच तोडून थेट आत शिरल्या होत्या. मात्र, बस चालकाच्या सतर्कतेमुळे एक मोठी जीवितहानी टळली आहे.


ही थरारक घटना बल्लारपूर येथील शासकीय रुग्णालयासमोर मुख्य मार्गावर घडली. नेहमीप्रमाणे हा रस्ता वाहतुकीने गजबजलेला असतो. अचानक एका मोठ्या आवाजासह रस्त्याच्या कडेला असलेले जुने, अवाढव्य झाड थेट धावत्या बसवर कोसळले. झाड पडताच परिसरात एकच खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आणि बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.


या अपघाताची भीषणता एवढी होती की, झाडाच्या जड फांद्या बसच्या पुढच्या भागावर आदळल्या आणि समोरील काच फोडून थेट ड्रायव्हरच्या केबिनपर्यंत आत घुसल्या. मात्र, म्हणतात ना 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती'. या कठीण प्रसंगात बस चालकाने दाखवलेले प्रसंगावधान अत्यंत महत्त्वाचे ठरले.
झाड कोसळण्याचा आवाज येताच चालकाने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ ब्रेक लावले. बस जागच्या जागी थांबल्यामुळे झाड फक्त पुढच्या भागावर पडले. जर बस काही फूट जरी पुढे गेली असती, तर हे संपूर्ण झाड बसच्या छतावर कोसळले असते आणि मोठी जीवितहानी झाली असती. चालकाच्या या तत्परतेमुळे बसमधील सर्व ४० प्रवाशांचे प्राण सुखरूप वाचले आहेत.


या अपघातानंतर चंद्रपूर-तेलंगणा मुख्य मार्गावरील वाहतूक तब्बल तीन तासांपेक्षा जास्त वेळ पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने जेसीबी, क्रेन आणि कटर मशीनच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या कापून बाजूला काढल्या. जवळपास तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा मोकळा करण्यात आला.