Accident News: : एकाच चितेवर पाच जिवांचा अखेरचा प्रवास; चंद्रपुरातील जीवने कुटुंबाला अश्रुपूर्ण निरोप

Bhairav Diwase
चंद्रपूर:- समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात काळाच्या पडद्याआड गेलेल्या जीवने कुटुंबातील पाच सदस्यांना सोमवारी (ता. २९) चंद्रपुरात शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. शांतीधाम स्मशानभूमीत एकाच चितेवर पाचही पार्थिवांवर अंत्यसंस्कार होताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग उपस्थित सर्वांना हेलावून गेला.


वेकोलितून सेवानिवृत्त झालेले महादेव जीवने (वय ६३) व त्यांची पत्नी लता जीवने (वय ५६) हे बाबुपेठ येथील डी.एड. महाविद्यालयाजवळ वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा भास्कर जीवने (वय ४२), सून आरती जीवने (वय ३७) आणि नात त्रिशा (वय १२) हे बियाणीनगर परिसरात राहत होते. भास्कर जीवने हे भटाळी वेकोलित अधिकारी म्हणून कार्यरत होते, तर आरती जीवने या महिला व बालविकास विभागात अधिकारी होत्या. नुकतीच त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून अकोला येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. आरती यांना अकोल्याला सोडण्यासाठी रविवारी सकाळी संपूर्ण कुटुंब चारचाकी वाहनाने निघाले होते.


मात्र, धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १०६ परिसरात त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव वेगात जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात महादेव, लता, भास्कर, आरती आणि चिमुकली त्रिशा या पाचही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची बातमी समजताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली.सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास पाचही पार्थिव चंद्रपुरात आणण्यात आले. आरती जीवने यांचे वडील दीपक जगताप यांच्या तुकूम येथील निवासस्थानी भास्कर, आरती आणि त्रिशा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. तर महादेव आणि लता जीवने यांचे पार्थिव बाबुपेठ येथील निवासस्थानी ठेवण्यात आले. त्यानंतर तिन्ही पार्थिव काही काळ बियाणीनगर येथील जीवने कुटुंबाच्या घरी अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. अखेरीस सर्व पाचही पार्थिव बाबुपेठ येथील निवासस्थानी आणण्यात आल्यानंतर दुपारी सुमारे चार वाजता अंत्ययात्रेला सुरवात झाली.


शोकमग्न वातावरणात नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा शांतीधाम स्मशानभूमीत पोहोचली. तेथे एकाच सरणावर पाचही पार्थिव ठेवण्यात आल्यानंतर उपस्थितांना अश्रू अनावर झाले. एका कुटुंबातील पाच जिवांचा एकाच वेळी निरोप घेण्याची वेळ आल्याने वातावरण अत्यंत विदारक झाले होते. भास्कर जीवने यांच्या बहिणी व भाच्यांनी मुखाग्नी दिला. यावेळी जगताप आणि जीवने कुटुंबीयांसह वेकोलि, जिल्हा परिषद तसेच महिला व बालविकास विभागातील अधिकारी-कर्मचारी, मित्रपरिवार आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.