झोपेत साप चावल्याने ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; वेळेवर रुग्णवाहिकाच मिळाली नाही!
चंद्रपूर:- ग्रामीण भागातील खिळखिळी झालेली आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा एका चिमुकल्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप होत आहे. जिवती तालुक्यातील लचमागुडा गावात झोपेत असताना एका ६ वर्षीय चिमुकल्याला विषारी सापाने दंश केला. मात्र, वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने, उपचाराला विलंब झाला आणि या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समीर मारोती आत्राम, असे या मृत बालकाचे नाव आहे.
काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली आहे चंद्रपूरच्या दुर्गम आणि डोंगराळ समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील लचमागुडा गावात. ६ वर्षांचा समीर मारोती आत्राम आपल्या घरात गाढ झोपेत असताना, एका विषारी सापाने त्याला दंश केला. समीरला तातडीने पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार तर झाले, परंतु त्याची गंभीर प्रकृती पाहता त्याला पुढील उपचारासाठी तात्काळ मोठ्या रुग्णालयात हलवणे गरजेचे होते.
पण खरी शोकांतिका इथेच सुरू झाली. सरकारी नियमांनुसार २४ तास सेवा देणारी रुग्णवाहिका या आरोग्य केंद्रात ऐन वेळी उपलब्धच नव्हती. हतबल झालेल्या नातेवाईकांनी अखेर एका खासगी वाहनाचा शोध घेतला आणि समीरला गडचांदूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, लचमागुडा ते पाटण आणि तिथून गडचांदूर हा प्रवास करेपर्यंत सापाचे विष शरीरात पूर्णपणे पसरले होते. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच खूप उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी समीरला मृत घोषित केले.
समीरच्या या मृत्यूने लचमागुडा गावावर शोककळा पसरली आहे, तर दुसरीकडे जिवती तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या चिंधड्या उडाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही दुर्गम भागात वेळेवर एक रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नसेल, तर या डिजिटल युगातल्या आरोग्य सेवांचा काय फायदा? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल का? आणि जिवती तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

