Chandrapur News: शेतातील खड्ड्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू!

Bhairav Diwase
भद्रावती:- दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. भद्रावती तालुक्यातील पाचगाव येथे बुधवारी ही हृदयद्रावक घटना घडली. कार्तिक संदीप सावसाकडे आणि सानिध्य विजय दुधनकर अशी मृत मुलांची नावे आहेत. फवारणीसाठी शेतात तयार केलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून या दोन्ही मित्रांचा अंत झालाय.


काल सकाळी साडेदहाच्या सुमारास कार्तिक, सानिध्य आणि त्यांचा तिसरा मित्र आदित्य राऊत हे घरून बाहेर पडले होते. इरई धरण परिसरातील एका शेतात फवारणीसाठी पाण्याचा साठा केला होता. तिथे गेल्यावर या तिघांनाही पोहण्याचा मोह आवरला नाही आणि ते पाण्यात उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने कार्तिक आणि सानिध्य खोल पाण्यात बुडू लागले. त्यांचा तिसरा मित्र आदित्य याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. अखेर आदित्यने प्रसंगावधान राखत गावाकडे धाव घेतली आणि गावकऱ्यांना बोलावले.


गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन दोघांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेमुळे पाचगाव परिसरावर शोककळा पसरली असून भद्रावती पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.