सावली:- सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील आसोला तलावात मासेमारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा डोंगा पलटल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आसोला चक येथील रहिवासी असलेले गुरुदास जयराम मेश्राम, वय ३७ वर्षे, हे २४ जून रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे आसोला तलावात मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक त्यांचा डोंगा पलटला आणि ते खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितेश डोर्लीकर यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने काल रात्री उशिरापर्यंत तलावात शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र रात्रीचा अंधार वाढल्याने शोधकार्य थांबवावे लागले होते.
आज सकाळी पुन्हा एकदा पाथरी पोलीस आणि स्थानिकांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. अखेर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गुरुदास मेश्राम यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात यश आले. पाथरी पोलिसांकडून मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
आसोला तलाव हा परिसरातील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र, यापूर्वीही येथे अशा अनेक जीवघेण्या घटना घडल्या आहेत. मृत गुरुदास मेश्राम यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने मेश्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

