Yuvasena Chandrapur: खासदार फुटीनंतर ठाकरे गट आक्रमक

Bhairav Diwase
चंद्रपुरात युवासेनेचे 'जोडेमारो' आंदोलन
चंद्रपूर:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. या बंडखोरीचे तीव्र पडसाद चंद्रपुरात उमटले असून, युवासेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार 'जोडेमारो' आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला आहे.


चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आज युवासेनेच्या घोषणाबाजीने दणाणून गेला होता. युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र येत बंडखोर खासदारांविरोधात तीव्र निदर्शने केली. 'गद्दार' खासदारांच्या फोटोंना जोडे मारत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला.


आंदोलकांचा आरोप आहे की, संबंधित खासदारांनी लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर आणि महाविकास आघाडीच्या बळावर लढवली. मतदारांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले, मात्र त्यांनी आता शिंदे गटात प्रवेश करून मतदारांशी आणि पक्षाशी बेईमानी केली आहे.


जो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नावावर आणि चेहऱ्यावर निवडून आला, त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला आहे. हा मतदारांचा आणि शिवसैनिकांचा घोर अपमान आहे. आम्ही जाहीर इशारा देतो की, हे बंडखोर खासदार जर चंद्रपूर जिल्ह्यात आले, तर युवासेना त्यांना काळे फासल्याशिवाय राहणार नाही!
विक्रांत सहारे जिल्हाप्रमुख
शिवसेना (उबाठा) युवासेना, चंद्रपूर