Chandrapur poisoning-suicide case:: चंद्रपूर विषप्राशन आत्महत्या प्रकरण: तपास आता CID कडे!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता, मृतकास व त्याच्या परिवारास योग्य न्याय मिळावा यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी थेट दखल घेतली आहे.


संपूर्ण तपास प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबविण्याचे कडक निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले असून, प्रशासनाने तातडीने काही महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत.
तपासात कोणतीही त्रुटी राहू नये आणि संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर व निष्पक्ष राहावी यासाठी मृतकाचा 'इनक्वेस्ट पंचनामा' स्वतः विशेष दंडाधिकाऱ्यांच्या (Special Magistrate) थेट उपस्थितीत आणि देखरेखीखाली पूर्ण करण्यात आला आहे.


त्याचप्रमाणे, मृत्यूचे अचूक आणि तांत्रिक कारण (Technical Reason) स्पष्ट व्हावे यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-Mortem) कोणत्याही एका डॉक्टरांकडून न करता, तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष वैद्यकीय चमूद्वारे (Medical Board) करण्यात आले आहे. या संपूर्ण वैद्यकीय प्रक्रियेत कमालीची पारदर्शकता पाळण्यात आली आहे.


पुढील तपास 'सीआयडी'कडे!

या प्रकरणाला आता अत्यंत उच्चस्तरीय वळण मिळाले असून, प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा यासाठी पोलीस अधीक्षकांनी केलेल्या शिफारसीवरून हा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग करण्यात आला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची सूत्रे हाती घेतली असून, पुढील कायदेशीर तपास अत्यंत वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने सुरू करण्यात आला आहे.