चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने अकोला येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य मोठ्या उत्साहात अकोल्याकडे रवाना झाले. पत्रकारांच्या हक्कांसाठी, संघटनात्मक बळकटीसाठी आणि पत्रकार संरक्षणाच्या विविध मुद्द्यांवर होणाऱ्या या राज्यस्तरीय अधिवेशनाकडे राज्यभरातील पत्रकारांचे लक्ष लागले आहे.
या अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकार कल्याण, संघटनात्मक मजबुती, बदलत्या पत्रकारितेतील आव्हाने तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय पत्रकारांचा गौरव अशा महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात, जिल्हा सरचिटणीस केवलसिंग जुनी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी व सदस्य अधिवेशनासाठी रवाना झाले.
यामध्ये मूल तालुका अध्यक्ष सतीश राजूरवार, राजुरा तालुक्याचे सहसचिव लोकेश पारखी, राजू शंभरकर, रत्नाकर पायपरे यांच्यासह राजुरा, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, कोरपना, जिवती, मुल आणि चंद्रपूर शहर येथील तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे.
प्रवासादरम्यान समृद्धी महामार्गावरील टोल प्लाझाजवळ सर्व प्रतिनिधींनी एकत्रित छायाचित्र काढत अधिवेशनाबाबतचा उत्साह व्यक्त केला. राज्यस्तरीय अधिवेशनातून पत्रकारांच्या हक्कांसाठी प्रभावी दिशा मिळेल, संघटनात्मक बळकटी वाढेल आणि पत्रकारितेतील नव्या आव्हानांवर मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांच्या भरीव उपस्थितीमुळे यंदाच्या राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विशेष लक्षवेधी ठरणार आहे.

