चंद्रपूर:- पोलीस कर्मचाऱ्यांच्या छळाला आणि लाचखोरीला कंटाळून एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरात घडली आहे. या प्रकरणाची पोलीस अधीक्षकांनी अत्यंत गंभीर दखल घेतली असून, आत्महत्येपूर्वी व्हिडिओमध्ये नाव घेतलेल्या शहर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह (API) तीन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका संवेदनशील प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. एका तरुणाने पोलिसांवर मानसिक छळ आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करत विष प्राशन करून आपले जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी या तरुणाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने थेट पोलीस कर्मचाऱ्यांची नावे घेतली होती.
या व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी कारवाईचे आदेश दिले. यामध्ये चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोलीस शिपाई रुपेश पराते आणि महिला शिपाई भावना रामटेके या तिघांचीही तातडीने सिटी पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्षात (Control Room) बदली करण्यात आली आहे.
मृत्यूपूर्वी तरुणाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या लाचखोरीचा आणि धमकावण्याचा पर्दाफाश केला होता. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, यासाठी गृहविभागाकडून आणि वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजेच 'सीआयडी'कडे (CID) सोपविण्यात आला आहे. काल रात्रीच सीआयडीचे विशेष पथक तपासासाठी चंद्रपुरात दाखल झाले असून त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, लाचखोर आणि छळ करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणात तातडीने उचलबांगडीची कारवाई केली असली, तरी सीआयडी तपासात आता काय धक्कादायक बाबी समोर येतात आणि दोषी पोलिसांवर कायदेशीर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

