'Itankar Paan Center' Sealed: जटपुरा गेट येथील 'इटनकर पान मंदिर' सील!

Bhairav Diwase


चंद्रपूर:- शहरातील अमली पदार्थ (Drugs) विक्रेत्यांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी ज्या दुकान मालकाकडून लाखो रुपयांचे 'MD' अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते, ते जटपुरा गेट परिसरातील 'इटनकर पान मंदिर' आज प्रशासनाने अधिकृतपणे सील केले आहे.    
    

चंद्रपूर शहरातील वर्दळीचा आणि मध्यवर्ती भाग असलेल्या जटपुरा गेट परिसरात हे इटनकर पान मंदिर आहे. काही दिवसांपूर्वी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी येथे छापा टाकला होता. या छाप्यात तब्बल १०४ ग्रॅम 'MD' (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता, ज्याची बाजारातील किंमत लाखो रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पानटपरीचा मालक ओम संतोष इटनकर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.    
    
    
या प्रकरणाच्या सखोल तपासानंतर आज अन्न व औषध प्रशासन (FDA), चंद्रपूर पोलीस विभाग आणि चंद्रपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त पथकाने या आस्थापनेवर धडक कारवाई केली. तपासणीदरम्यान या दुकानाचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे समोर आले. नियमबाह्य व्यवसाय आणि गुन्हेगारी कृत्यात सहभाग आढळल्याने या तिन्ही विभागांनी मिळून 'इटनकर पान मंदिर'ला टाळे ठोकले असून ते पूर्णपणे सील केले आहे. या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.    
    
चंद्रपूर जिल्ह्याला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. अमली पदार्थांची विक्री करणारे किंवा त्याचे सेवन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. येणाऱ्या दिवसांत ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल आणि अशा प्रकारच्या कडक कारवाया यापुढेही सुरूच राहतील. आयुष नोपानी पोलीस अधीक्षक, चंद्रपूर