Chandrapur News: घरूनच चालत होता गांजा विक्रीचा काळा धंदा

Bhairav Diwase
१५ हजारांच्या गांजासह आरोपी गजाआड!
चंद्रपूर:- शहरातील भिवापूर वार्डात आपल्या राहत्या घरातून गांजाची छुप्या पद्धतीने साठवणूक आणि विक्री करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. पांडुरंग बानलवार (रा. भिवापूर वार्ड, चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या घरातून तब्बल १ किलो १०९ ग्रॅम वजनाचा १५,००० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.


दिनांक १५ जुलै २०२६ रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) राजेंद्र सोनवणे हे आपल्या डी.बी. (DB) पथकासह बेकायदेशीर जुगार, दारू व अंमली पदार्थ विरोधी कारवायांसाठी परिसरात पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून (मुखबीर) अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की, भिवापूर वार्ड येथील रहिवासी पांडुरंग बानलवार हा स्वतःच्या घरात बेकायदेशीरपणे गांजा बाळगून त्याची विक्री करत आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न दवडता दोन पंचांना सोबत घेतले आणि भिवापूर वार्ड येथील पांडुरंग बानलवार याच्या घरावर छापा टाकला.


पोलिसांनी पंचांसमक्ष बानलवार याच्या घराची कसून झडती घेतली. घराच्या पहिल्या खोलीतील बेडखाली तपासणी केली असता, तेथे एका प्लास्टिक पिशवीमध्ये संशयास्पद वाळलेली हिरव्या रंगाची पाने, फुले, देठ आणि बिया असे मिश्रण असलेली गांजा सदृश्य वनस्पती मिळून आली. पोलिसांनी वजन केले असता ते १ किलो १०९ ग्रॅम भरले, ज्याची अंदाजे किंमत १५,००० रुपये आहे.


पोलिसांनी तात्काळ हा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी पांडुरंग बानलवार याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) च्या कलम ८ (क) आणि २०(ब) (२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


सदर धडक कारवाई चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


या मोहिमेचे नेतृत्व चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांनी केले. तर प्रत्यक्ष कारवाईमध्ये सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलते, पोउपनि विलास निकोडे व डी.बी. पथकातील मपोहवा. भावना रामटेके, पो. हवा. संजय धोटे, जावेद सिद्दीकी, रूपेश रणदिवे, संतोष दंडेवार, संतोष कनकम, नापोअं कपुरचंद खरवार, पो.अं. रूपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, सुशांत घिवे, प्रफुल भैसारे आणि दिपीका झिंगरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.