Gondpipari News: दारूच्या नशेत विहिरीत मारली उडी; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

Bhairav Diwase

गोंडपिपरी:- दारूच्या नशेत एका व्यक्तीने स्वतःच्या घरासमोरील विहिरीत उडी मारल्याची थरारक घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे शनिवारी (दि. १८) घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, स्थानिक गावकऱ्यांनी दाखविलेले प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे संबंधित व्यक्तीचे प्राण बालंबाल वाचले.


मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडा येथील रहिवासी बंडू मडावी (वय ४८ वर्षे) यांनी शनिवारी दारूच्या नशेत घरासमोरील विहिरीत अचानक उडी घेतली. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. काही वेळातच घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली आणि मडावी यांना विहिरीबाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले.


नशेत खाट पायाने ढकलली! सुरुवातीला ग्रामस्थांनी एक दोरी खाटेला (चारपाई) बांधून ती विहिरीत सोडली, जेणेकरून मडावी त्यावर बसून वर येऊ शकतील. मात्र, दारूची नशा एवढी जास्त होती की त्यांनी ती खाट पायाने बाजूला ढकलून दिली. मडावी सहकार्य करत नसल्याने विहिरीबाहेर उभ्या असलेल्या नागरिकांची चिंता आणि धाकधूक अधिकच वाढली.

अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर यश यानंतर गावकऱ्यांनी पुन्हा एक दोरी विहिरीत सोडली आणि मडावी यांना ती पकडण्यासाठी विनवणी करण्यास सुरुवात केली. विहिरीबाहेरून नागरिक त्यांना सतत धीर देत होते आणि समजावून सांगत होते. जवळपास अर्धा तास चाललेल्या या मनधरणीनंतर अखेर बंडू मडावी यांनी ती दोरी घट्ट पकडली. दोरी हातात येताच ग्रामस्थांनी एकजुटीने ती वर ओढली आणि मडावी यांना सुखरूप बाहेर काढले. मडावी बाहेर येताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

व्यसनाधीनतेवर चिंता व्यक्त गावकऱ्यांनी वेळेवर दाखविलेले धैर्य आणि सामाजिक बांधिलकीमुळे आज एक मोठी जीवितहानी टळली. जर नागरिकांनी वेळेवर धाव घेतली नसती, तर अनर्थ घडला असता, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेनंतर परिसरात एकीकडे गावकऱ्यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे दारूच्या व्यसनामुळे घडणाऱ्या अशा जीवघेण्या प्रकारांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार करावा, असा सूर या निमित्ताने गावातून उमटत आहे.