Accident on Independence Day: स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात!

Bhairav Diwase
ट्रॅव्हल्सच्या धडकेत ३ शाळकरी मुलींचा मृत्यू
वर्धा:- संपूर्ण देश आज ८० व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करत असतानाच महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातून एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. हिंगणघाट शहरातील आंबेडकर शाळेजवळ एका भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.


या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच हिंगणघाट शहरावर भीषण शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि मिसबा शेख अशी अपघातात मृत्यू झालेल्या शाळकरी मुलींची नावे आहेत.


स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहातच तीन चिमुकल्या मुलींचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच हिंगणघाट शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली असून, वाहतूक सुरळीत केली आहे. याप्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस घटनेचा पुढील सविस्तर तपास करत आहेत.


समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि मिसबा शेख या तिन्ही मुली दुचाकीवरून स्वातंत्र्यदिनासाठी जात होत्या, त्याचवेळी आंबेडकर शाळेजवळ मागून येणाऱ्या भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने दोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की धडक बसताच तिन्ही मुली रस्त्यावर फेकल्या गेल्या अन् गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून जखमी मुलींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान या तिन्ही निष्पाप मुलींची प्राणज्योत मालवली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.