Warora News: महिलांचे अनोखे आंदोलन: ग्रामसभा रद्द झाल्याने थेट ग्रामपंचायतीच्या छतावर चढल्या!

Bhairav Diwase
वरोरा:- ग्रामसभेच्या मागणीसाठी आटमुर्डी गावातील महिला कमालीच्या आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर चढून आंदोलन सुरू केले आहे.


 वरोरा तालुक्यातील आटमुर्डी गावात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील विविध नागरी समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते. परंतु, ग्रामसभेच्या अध्यक्षा असलेल्या महिला सरपंच वैशाली दरेकर या ऐनवेळी अनुपस्थित राहिल्या. अध्यक्षांच्या गैरहजेरीमुळे प्रशासनाकडून ही ग्रामसभा रद्द करण्यात आली.


ग्रामसभा रद्द झाल्याची माहिती मिळताच उपस्थित महिलांचा राग अनावर झाला. संतप्त झालेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाचे छत गाठले आणि तिथेच ठिय्या मांडला. "जोपर्यंत ग्रामसभा आयोजित केली जात नाही आणि आमचे प्रश्न ऐकून घेतले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही छतावरून खाली उतरणार नाही," अशी ठाम भूमिका आंदोलक महिलांनी घेतली आहे. सरपंचांच्या या गैरहजेरीमुळे आणि ग्रामसभा रद्द झाल्याने संपूर्ण आटमुर्डी गावात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. ऐनवेळी ग्रामसभा रद्द झाल्याने प्रशासनाचा कारभार आणि सरपंचांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.