चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील कोसारा परिसरातील एका निर्जन घरावर छापा टाकून अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाच्या (AAP) कार्यकर्त्यांनी पाळत ठेवून पोलीस आणि पुरवठा विभागाच्या मदतीने ही संयुक्त कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर कमी वजनाचे आणि बेकायदेशीरपणे रिफिल केलेले सिलेंडर जप्त करण्यात आले असून या प्रकारामुळे गॅस ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चंद्रपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारा आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारा बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा अड्डा उघडकीस आला आहे.
कोसारा येथील एका निर्जन भागातील घरात हा काळाबाजार सुरू होता. विविध गॅस एजन्सींमधून ग्राहकांच्या घरासाठी निघणाऱ्या गाड्या थेट या अड्ड्यावर यायच्या. तेथे विशेष नोझलचा वापर करून भरलेल्या सिलेंडरमधून गॅस काढून रिकाम्या सिलेंडरमध्ये भरला जात असे. परिणामी, सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक सिलेंडरमध्ये २ ते अडीच किलो गॅस कमी आढळत होता.
आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या संशयित हालचालींवर पाळत ठेवून पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या मदतीने धाड टाकली. मात्र, या संपूर्ण कारवाईदरम्यान पुरवठा आणि महसूल विभागाचा अत्यंत सुस्त कारभार समोर आला आहे. मुख्य विक्री अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही पुरवठा अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले असून, कोणताही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी आता जोर धरत आहे.
