Agitation suspended for now: चंद्रपूरातील आदिवासी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित!

Bhairav Diwase
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांचा निर्णय
चंद्रपूर:- महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने ५ आणि १४ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या वसतिगृह प्रवेशाच्या नव्या शासन निर्णयाविरोधात चंद्रपुरात मोठा असंतोष पाहायला मिळाला. शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृह क्र. १ आणि २ च्या विद्यार्थ्यांनी 'एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प' कार्यालयासमोर सलग चार दिवस मुक्कामी ठिय्या आंदोलन पुकारले होते.

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी प्रशासकीय मध्यस्थी केली. ग्रामीण व दुर्गम भागातील कोणताही गरीब आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शासनाची सकारात्मक भूमिका स्पष्ट केली.


शासकीय नियमांनुसार वयाची ३० वर्षे पूर्ण झालेल्या किंवा व्यावसायिक, उच्च शिक्षण पीएच.डी., एम.फिल., पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण तसेच इतर विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, त्यांना ‘स्वयंम’ योजनेच्या धर्तीवर थेट आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे.


शासकीय वसतिगृह प्रवेशाबाबत जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाविरोधात आक्रमक झालेल्या चंद्रपूरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अखेर आपले ४ दिवसांचे बेमुदत ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे. पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.


पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन तूर्तास स्थगित केले असले, तरी हे केवळ अस्थायी पाऊल असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. दिलेल्या आश्वासनांची लवकरात लवकर अंमलबजावणी झाली नाही, तर पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा थेट इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


गेल्या चार दिवसांपासून प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर आमचं ठिय्या आंदोलन सुरू होते. आज प्रकल्प अधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर प्रकल्प अधिकारी यांनी आदिवासी विकास मंत्री यांच्यासोबत फोन द्वारे चर्चा घडवून दिली. त्या चर्चेअंती आम्ही हे आंदोलन तूर्तास स्थगित करीत आहो. व नागपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आमचा प्रत्यक्ष पाठिंबा असेल.
आंदोलन विद्यार्थी 


गेल्या चार दिवसांपासून प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. आज रात्रौला विद्यार्थी माझ्याकडे आले त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर मंत्री साहेबासोबत विद्यार्थ्यांचे बोलणं करुन दिले. त्या चर्चेअंती हे आंदोलन तूर्तास स्थगित करीत आहो असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
विकास राचेलवार प्रकल्प अधिकारी 
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर