भद्रावती:- घोडपेठ येथील 'हॉटेल गारवा' मध्ये अस्वच्छतेची तक्रार करणाऱ्या एका ग्राहकाला थेट जीवघेण्या हल्ल्याला सामोरे जावे लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पिण्याच्या पाण्यात कचरा दिसून आल्याने विचारणा केल्याच्या रागातून हॉटेल मालकाच्या नातेवाईकाने ग्राहकाच्या डोक्यात थेट १ किलोचा वजनकाटा मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक शिवम वऱ्हाडे हे त्यांचे मित्र प्रदीप यांच्यासह घोडपेठ येथील 'हॉटेल गारवा' मध्ये गेले होते. तेथे त्यांना पिण्याच्या पाण्यात कचरा दिसून आल्याने त्यांनी हॉटेल मालक सुधीर राऊत यांच्याकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीनंतर दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. याच वादादरम्यान हॉटेल मालकाचा साळा मिलिंद सुधाकर चौधरी याने रागाच्या भरात शिवमच्या डोक्यात १ किलोचा लोखंडी वजनकाटा मारला. या प्राणघातक हल्ल्यात शिवम गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर जखमी शिवम आणि त्यांच्या आईने तत्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून आला असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

