चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिका आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ८३ हून अधिक सुशिक्षित बेरोजगारांना ३८ लाख तीन हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मुख्य आरोपीसह त्याच्या महिला साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. जितेंद्र सारसर आणि मंगला संभा वानखेडे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
मोठ्या पदाची फुशारकी आणि बनावट फोन कॉल:
या भामटेगिरीचा मुख्य सूत्रधार जितेंद्र सारसर हा चंद्रपूर मनपामध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. मात्र, "मी मनपामध्ये मोठ्या पदावर असून माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उठबस आहे," अशी फुशारकी तो मारत असे. केवळ अडीच लाख रुपयांत मनपा व जीएसटी विभागात कंत्राटी नोकरी लावून देतो, असे सांगून तो बेरोजगारांना जाळ्यात ओढायचा. तरुणांना विश्वास बसावा म्हणून तो त्यांच्यासमोरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून नोकरीबाबत बोलण्याचे नाटकही करायचा. या संपूर्ण फसवणुकीत मंगला वानखेडे ही त्याला पूर्ण साथ देत होती.
पोलीस ठाण्यात आपबिती आणि कारवाई:
पैसे देऊनही महिने उलटून नोकरी न लागल्याने संतापलेल्या व फसवणूक झालेल्या तरुणांनी शेवटी रामनगर पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. तरुणांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) फसवणूक आणि धमकीचा गुन्हा दाखल केला.
पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ चक्रे फिरवून जितेंद्र सारसर आणि मंगला वानखेडे या दोघांना अटक केली. या रॅकेटमध्ये आणखी कोणा बड्या अधिकाऱ्याचा किंवा मध्यस्थाचा हात आहे का, याचा पुढील कसून तपास रामनगर पोलीस करत आहेत.

