नागभीड:- नागभीड तालुक्यातील घोडाझरी जंगल परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या ६५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चिंधिमाल गावाजवळील तलाव परिसरात चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मोरेश्वर गोपिचंद सावसाकडे (वय ६५, रा. तुकुम, तिवर्ला) यांचा मृतदेह बुधवारी (दि. १९) आढळून आला. घटनास्थळी मासेमारीचे साहित्य तसेच वाघाच्या हल्ल्याची चिन्हे आढळल्याने त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरेश्वर सावसाकडे हे १६ ऑगस्ट रोजी घोडाझरी जंगल परिसरातील चिंधिमाल तलाव येथे मासेमारीसाठी गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. १७ ऑगस्ट रोजी याबाबत वनविभाग आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर वनविभाग व पोलिसांच्या पथकांकडून जंगल परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत होती.
चार दिवसांच्या शोधमोहीमेदरम्यान चिंधिमाल गावाजवळील तलाव परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ मासेमारीचे साहित्य पडलेले होते. परिसरात मोठ्या प्रमाणात उंच गवत असल्याने जवळ आल्यानंतरच वन्यप्राण्याची चाहूल लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी वाघाच्या हल्ल्याची चिन्हे आढळून आल्याने वनविभागाकडून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
