चंद्रपूर:- चंद्रपूर पोलीस दलाच्या वतीने 'नशामुक्त युवा भारत अभियान' अंतर्गत आज जिल्ह्यात एकाच वेळी एका व्यापक जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील तब्बल २०३ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये "Say No to Drugs" म्हणजेच अमली पदार्थांना नकार देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी अमली पदार्थांचे सेवन न करण्याची आणि नशामुक्त समाज घडविण्यासाठी पुढाकार घेण्याची सामूहिक शपथ घेतली.
या जनजागृती अभियानात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः मैदानावर उतरून सहभाग नोंदवला.
सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर: येथे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथविधी पार पडला.
शिवाजी हायस्कूल, राजुरा: राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
बी.जे.एम. कार्मेल अकॅडमी, चंद्रपूर: जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत आणि पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत अमली पदार्थांचे घातक दुष्परिणाम समजावून सांगितले.
खत्री कॉलेज, चंद्रपूर: उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा निर्धार केला.
तरुणांना व्यसनाधीनतेच्या विळख्यापासून दूर ठेवून एक निरोगी व सुरक्षित पिढी घडवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, शिक्षक आणि नागरिकांच्या सहभागामुळे या अभियानाला खऱ्या अर्थाने जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. चंद्रपूर पोलीस दलातर्फे भविष्यातही असे प्रतिबंधात्मक उपक्रम सातत्याने राबवले जाणार आहेत.
