चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील उसागाव येथील बळीराजा आज एका मोठ्या संकटात सापडला आहे. मे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या लोहखनिज प्रकल्पाच्या बेकायदेशीर रासायनिक कचऱ्यामुळे आणि रासायनिक द्रव्यामुळे शेतकाऱ्यांची तब्बल १०० एकर सुपीक शेतजमीन पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या आरोपानुसार, कारखान्यातून निघणारे घातक रासायनिक द्रव्य आणि दूषित कचरा थेट स्थानिक नाल्यांमध्ये सोडला जात आहे. यामुळे नाल्याचे पाणी विषारी झाले असून तेच पाणी पुढे जाऊन वर्धा नदीला मिळत आहे. यामुळे केवळ पशु-पक्षी व वन्यजीवच नाही, तर वर्धा नदीवर अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाशी साठगाठ करून नियमांचे उल्लंघन दुर्लक्षित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, कारखान्यात कामाला असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीवरून काढून टाकण्याची व धमकावण्याची मनमानी सुरू असल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, वर्षानुवर्षे झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई मिळावी व या प्रदूषणावर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी. न्याय न मिळाल्यास २५ ऑगस्ट रोजी जिल्हा कार्यालयासमोर सहपरिवारासह आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आता तरी प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय देणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
