चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वॉर्ड परिसरात राहत्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली असून, वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दोन महिला दलालांना अटक करण्यात आली आहे.
काल (दि. ०१ ऑक्टोबर २०२६) रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वॉर्डात, लव्ह इंडिया चर्चच्या मागे असलेल्या एका राहत्या घरात काही महिलांकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे.
या मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री पटल्यानंतर, पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व त्यांच्या पथकाने सापळा रचला. अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये पंचांसमक्ष आणि सोशल वर्कर्सच्या उपस्थितीत या ठिकाणी एक बनावट ग्राहक (Decoy Customer) पाठवण्यात आला. खात्री पटताच पथकाने तातडीने पंचांसह त्या घरी धाड टाकली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन महिला दलालांना ताब्यात घेतले:
१. मुस्कान शफीक शेख (वय ४० वर्षे, रा. रॉयनगर, लव्ह इंडिया चर्चजवळ, अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर; मूळ रा. उसगाव, ता. घुग्गुस, जि. चंद्रपूर)
२. रेशमा उर्फ तैबुल फतिमा अब्दुल रफीक शेख (वय ४५ वर्षे, रा. टॉवर टेकडी, जुनोना चौक, अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर)
हे दोघी जण आपसात संगनमत करून पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल, रोख रक्कम आणि कंडोम बॉक्स असा एकूण २२,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या रॅकेटच्या जाळ्यात अडकलेल्या दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
या प्रकरणी आरोपी महिलांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५, ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर तपास रामनगर पोलिसांमार्फत सुरू आहे. ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सुनील गौरकार आणि त्यांच्या पथकातील अंमलदार तसेच मानवी व्यापार प्रतिबंध कक्षातील महिला कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे पार पाडली.
