बल्लारपूर:- दारूच्या नशेत असलेल्या एका बेफाम बोलेरो पिकअप चालकाने रस्त्यात येणाऱ्या वाहनांना धडक देत थेट एका दुचाकीस्वाराला चिरडले. या दुर्दैवी अपघातात मेडिकल व्यावसायिक अरशद खान यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अरशद खान हे आपले मेडिकल दुकान बंद करून नेहमीप्रमाणे दुचाकी क्रमांक (MH 34 CG 7786) ने बामणीच्या दिशेने जात होते. याच दरम्यान, मागून येणाऱ्या भरधाव बोलेरो पिकअप (क्रमांक MH 32 Q 2595) चालकाने जी.एन. कॉलेज परिसर जवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की अरशद खान गंभीररित्या जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बोलेरो चालक दारूच्या नशेत धुंद होता. मोपेडला धडक देण्यापूर्वी या चालकाने एका कारला आणि एका गाईलाही उडवले होते. एवढ्यावरच न थांबता, अरशद खान यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर चालक गाडी न थांबवता पळून गेला. पळून जाण्याच्या प्रयत्नात पुढे एका गावाजवळ या बोलेरो पिकअपची समोरून येणाऱ्या ट्रकला भीषण धडक बसली. या संपूर्ण थरारात इतर तीन -चार नागरिकही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या बल्लारपूर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठवले आहे. मद्यधुंद बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
