अमरावती:- ''भाजपच्या नेतृत्वातील महायुती विकासाच्या मुद्द्यांवर भर देत आहे. याउलट विरोधकांची आघाडी मला हरविण्यासाठी आणि सत्ता मिळविण्यासाठी लढत आहे. इंडिया आघाडीकडे मुद्द्यांचा दुष्काळ असल्यानेच निव्वळ शिवीगाळ करून अपमान करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे,'' असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत केला. आश्वासने पूर्ण करण्यासाठी अडचणींवर मात करण्याची ताकद हवी, असे मोदी या वेळी म्हणाले.
Also Read:- काँग्रेस हा वेल आहे जो पाठिंबा देणाऱ्याला सुकवतो
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या वर्धा व अमरावतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा झाली. देशाच्या विकासासाठी मोदींची गॅरंटी आहे. ही गॅरंटी निव्वळ बोलण्यातून येत नाही तर त्यासाठी कटिबद्धता पाहिजे, असे सांगून पंतप्रधानांनी आश्वासनांच्या पूर्ततेसाठी चोवीस तास काम करण्याची ग्वाही दिली. त्यांनी '२४ बाय ७ फॉर २०४७' असा नाराही दिला. मोदी म्हणाले,
''आश्वासने पूर्ण करण्यासाठी अडचणींवर मात करून काम करण्याची ताकद हवी. देशात काँग्रेसने आजवर केलेली पापे धुण्याचे काम या सरकारला करावे लागले. आता देशातील प्रत्येक मागास घटकाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे. देश विकासाच्या दिशेने पाऊल टाकत असताना कामे करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहून आशीर्वाद देण्याची गरज आहे.'' सभेसाठी संध्याकाळी पाचच्या सुमारास पंतप्रधानांचे मंचावर आगमन झाले. पाच वाजून ६ मिनिटांनी सुरू झालेले त्यांचे भाषण ३७ मिनिटे चालले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा, वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस, मंत्री अतुल सावे, आमदार समीर कुणावर आणि इतर स्थानिक नेते उपस्थित होते.