पोंभुर्णा:- पावसाअभावी शेतातील पिके सुकत असल्याने आणि शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची आशा मावळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा (माल) येथील ३५ वर्षीय शेतकरी महेंद्र दिवाकर राऊत यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेती हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेल्या शेतकऱ्यांसमोर निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठे संकट उभे राहत आहे. पावसाचा खंड आणि पिकांचे नुकसान यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढत आहेत. मोठ्या आशेने पेरणी केलेली पिके डोळ्यांदेखत सुकू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर वेळवा (माल) येथील महेंद्र दिवाकर राऊत यांच्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, अवघ्या एक वर्षाची चिमुकली मुलगी, आई आणि लहान भाऊ असा परिवार आहे.

