चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये सन २००४ मध्ये गुन्हा क्रमांक ६३/२००४ अंतर्गत भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ आणि ३२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी रमेश झिंगूजी खानोरकर, रा. कूर्झा, ब्रम्हपुरी याने आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. न्यायालयानेही त्याला फरार घोषित केले होते.
तेव्हापासून ब्रम्हपुरी पोलिसांकडून आरोपीचा सातत्याने शोध सुरू होता. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील नरसाळा परिसरात एक व्यक्ती अनेक वर्षांपासून एकटाच राहत असल्याची आणि त्याच्याकडे कोणी नातेवाईक येत नसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे ब्रम्हपुरी पोलिसांनी गुप्तपणे तपास सुरू केला. बारकाईने माहिती गोळा केल्यानंतर नरसाळा येथे नाव आणि ओळख लपवून राहणारा व्यक्ती हा २२ वर्षांपासून फरार असलेला आरोपी रमेश खानोरकर असल्याची खात्री पोलिसांनी केली. आरोपीला पोलिसांच्या हालचालींचा संशय येऊ नये, यासाठी त्याच्यावर गुप्तपणे लक्ष ठेवण्यात आले. अखेर १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांनी सापळा रचून तो राहत असलेल्या ठिकाणी अचानक छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर आणि पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे यांच्यासह पोलीस हवालदार मुकेश गजबे, मिलिंद नैताम तसेच पोलीस अंमलदार प्रवीण भिवगडे, इर्शाद खान, निलेश तुमसरे, स्वप्नील पळसपगार आणि वशिष्ट रंगारी यांनी सहभाग घेतला.
तब्बल २२ वर्षे नाव आणि ओळख लपवून राहणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात ब्रम्हपुरी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे जुन्या गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

