अंमली पदार्थ तस्करांवर जिल्ह्यात पहिल्यांदाच लागला 'MCOCA'!
चंद्रपूर:- चंद्रपूर पोलीस दलाने जिल्ह्यात प्रथमच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आणि शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका - MCOCA) १९९९ अंतर्गत ऐतिहासिक आणि धडक कारवाई केली आहे.
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या या कुख्यात टोळीवर नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या मंजुरीनंतर मकोकाची कलमे वाढविण्यात आली आहेत.
टोळीतील सराईत आरोपी
१. वसीमखान आरिफखान उर्फ कालू (वय ४० वर्ष, रा. नुरी चौक, बगड खिडकी, चंद्रपूर)
२. नसीबखान आरिफखान उर्फ मालू (वय ३९ वर्ष, रा. नुरी चौक, बगड खिडकी, चंद्रपूर)
३. जुबेर करिम खान (रा. बगड खिडकी, चंद्रपूर)
४. एक अन्य पाहिजे असलेला आरोपी
नमूद आरोपींवर अंमली पदार्थ तस्करीसह मारामारी व शरीराविरुद्धचे तब्बल २१ गंभीर गुन्हे पोलीस अभिलेखावर दाखल आहेत. रामनगर पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्रमांक ९८०/२०२६ मधील कलमांसोबतच मकोका कायदा १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके आणि त्यांच्या डी. बी. पथकातील अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
