नागभीड:- भावाला राखी बांधण्यासाठी पत्नीसह सासूरवाडीला आलेल्या जावयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ४) दुपारी मिंडाळा येथे उघडकीस आली. विकास कालिदास सहारे (वय ३०, रा. मुडझा, ता. ब्रह्मपुरी) असे मृतकाचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विकास सहारे हा रक्षाबंधनानिमित्त पत्नीसोबत नागभीड तालुक्यातील वासाळा मेंढा येथील सासूरवाडीस आला होता. दरम्यान, बुधवारी तो सायंकाळच्या सुमारास कोणालाही काही न सांगता घरातून अचानक निघून गेला. बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने नातेवाइकांनी त्याची शोधमोहीम सुरू केली. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. जावई बेपत्ता झाल्याने चिंताग्रस्त झालेल्या सासऱ्यांनी गुरुवारी (दि. ३) नागभीड पोलिस ठाणे, नागभीड येथे तक्रार नोंदवली होती.
पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच, शुक्रवारी (दि. ४) दुपारी मिंडाळा येथील एका विहिरीत विकासचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, त्याच्या आत्महत्येच्या कारणांचा पोलिस तपास करीत आहेत.
