Gadchandur News: कमिशनसाठी लपूनछपून उद्घाटन? भाजपाचा आरोप

Bhairav Diwase
गडचांदूर नगर परिषदेच्या कारभारावर भाजपचा कडाडून प्रहार
कोरपना:- गडचांदूर नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. शासकीय नियम आणि प्रोटोकॉलला बगल देऊन, कुठल्याही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीशिवाय लपूनछपून विकासकामांचे उद्घाटन केले जात असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे गटनेते सतीश बेतावार यांनी केला आहे.


गडचांदूर नगर परिषदेत सध्या सुरू असलेल्या विकासकामांच्या उद्घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पेटला आहे. जनतेच्या कराच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता असायला हवी, मात्र सध्याचे नगर परिषद अध्यक्ष आणि सत्ताधारी पदाधिकारी मनमानी कारभार करत आहेत, असा घणाघात सतीश बेतावार यांनी केला आहे.

या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करताना बेतावार म्हणाले की, “नगर परिषदेमार्फत होणाऱ्या विकासकामांचे शासकीय पद्धतीने उद्घाटन का केले जात नाही? भूमिपूजनाच्या वेळी मुख्याधिकारी, सिव्हिल इंजिनीअर किंवा नगर परिषदेचा एकही अधिकारी उपस्थित का नसतो?” केवळ श्रेय घेण्यासाठी आणि कमिशनच्या उद्देशाने हे सर्व लपूनछपून सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक कामात नियमांचे पालन होणे बंधनकारक असते. मात्र, सध्याच्या कारभारात या सर्व नियमांना डावलण्यात आले असून उद्घाटनाच्या अधिकृत प्रक्रियेबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी भाजपा गटनेते सतीश बेतावार यांनी केली आहे. या आरोपामुळे गडचांदूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आता सत्ताधारी यावर काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.