Tadoba Chandrapur : ताडोबा जंगल सफारी उद्यापासून पुन्हा सुरू

Bhairav Diwase
चंद्रपूर:- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सफारी आता उद्यापासून पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे जंगलप्रेमी, वन्यजीव छायाचित्रकार आणि पर्यटकांना पावसाळ्यानंतर हिरवाईने नटलेल्या ताडोबाचे नवे रूप अनुभवता येणार आहे. सफारी सुरू होण्यापूर्वीच पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापर्यंतचे अनेक सफारी स्लॉट बुक झाल्याची माहिती आहे.


पावसाळ्यात जंगलातील नैसर्गिक परिसंस्थेचे संवर्धन, वन्यजीवांच्या प्रजननाचा कालावधी तसेच वनव्यवस्थापनाची विविध कामे लक्षात घेऊन कोअर क्षेत्रातील पर्यटन बंद ठेवण्यात येते. या विश्रांतीनंतर आता जंगल पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. पावसामुळे ताडोबातील गवताळ प्रदेश, जलसाठे, बांबूची बेटे आणि झाडाझुडपांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या पर्यटन हंगामात ताडोबाचे हिरवेगार आणि निसर्गरम्य रूप पर्यटकांना पाहता येणार आहे. सफारीच्या प्रवेशद्वारांमधून पर्यटकांना जंगलभ्रमंती करता येते. ताडोबा परिसरात वाघांसह बिबट्या, अस्वल, रानकुत्रे, सांबर, चितळ, गवा तसेच विविध प्रजातींचे पक्षी आणि अन्य वन्यजीव आढळतात.  


पावसाळ्यानंतर जंगलातील पाणवठे, तलाव आणि गवताळ भागांमध्ये वन्यजीवांची हालचाल वाढते. त्यामुळे ऑक्टोबरपासून सुरू होणारा पर्यटन हंगाम वन्यजीवप्रेमींसाठी विशेष आकर्षणाचा ठरणार आहे. वाघाच्या दर्शनासोबतच ताडोबाची समृद्ध जैवविविधता अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. दरम्यान, सफारीसाठी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, आगामी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाशी संबंधित हॉटेल, रिसॉर्ट, वाहनचालक, गाईड आणि स्थानिक व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

 
ताडोबामध्ये एकूण २२ सफारी गेट असून बफरमध्ये १६ तर कोअर झोनमध्ये ६ सफारी गेट आहेत. ताडोबाच्या पर्यटन व्यवस्थेत मोहर्ली, कोलारा, खुटवंडा, नवेगाव, पांगडी, आणि झरी या प्रमुख कोअर प्रवेशद्वारांचा समावेश आहे. तर बफर क्षेत्रात मोहर्ली, कोलारा, नवेगाव तसेच पांगडी-झरी परिसरातील विविध प्रवेशद्वारांमधून पर्यटकांना सफारीचा आनंद घेता येतो.


१ ऑक्टोबरपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सफारी पुन्हा सुरू होत आहे. सफारीदरम्यान वन विभागाने निर्धारित केलेले नियम, वेळा आणि मार्गदर्शकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. पर्यटकांचा सुरक्षित आणि निसर्गपूरक अनुभव हे वन विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यावर्षी विदेशी पर्यटकांना सोयीचे व्हावे यासाठी २० गाईड्सना जर्मन, आणि २० गाईड्सना फ्रेन्च भाषेचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. सफारीचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वन विभागाच्या संकेतस्थळावरूनच बुकिंग करावे. – डॉ. प्रभूनाथ शुक्ल, प्रकल्प संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प