मुंबई:- महाराष्ट्रातील अग्निवीरांना आता थेट पोलीस दलात आणि इतर तत्सम पदांवर सामावून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जे अग्निवीर शासकीय सेवा करू इच्छितात त्यांच्यासाठी नोकरीचा मार्ग खुला झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, अग्निवीरांची पहिली तुकडी त्यांचा कार्यकाळ संपवून परत येणार आहेत. त्यातील अग्निवीरांना पोलीस आणि इतर तत्सम पदांवर त्यांना सामावून घेणार आहोत. त्यांना परीक्षा, प्रशिक्षणाची अट असणार नाही. त्यांना वयातही सूट दिली जाणार आहे. अग्निशमन दलातही त्यांना घेणार आहोत. जेवढे अग्निवीर शासनात येऊ इच्छितात त्यांना सामावून घेणार आहोत. नौदलातून जे अग्निवीर येतील त्यांना कोस्टल सुरक्षेत सामावून घेतले जाईल. विशेष बाब म्हणून पदांच्या संख्येची शिथिलता करून जेवढे अग्निवीर येतील त्यांना कोस्टल सुरक्षा सेवेत घेतले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
