चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये ९ सप्टेंबर २०२६ रोजी घडलेल्या भीषण आग दुर्घटना प्रकरणी एक मोठी कारवाई समोर आली आहे. अग्निसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी 'इंडियन मेडिकोज एजन्सी'च्या विरोधात चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९ सप्टेंबर रोजी रघुवंशी कॉम्प्लेक्स येथील 'इंडियन मेडिकोज एजन्सी' (प्रोप्रायटर: प्रा. कमलेश पाजणकर) या आस्थापनेत आगीची दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर प्रशासनाने केलेल्या चौकशीत या आस्थापनेत अग्निसुरक्षेशी संबंधित नियमांची पायमल्ली झाल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी दिलेल्या एफआयआरनुसार, या दुकानात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याची कोणतीही उपलब्धता नव्हती, तसेच फायर अलार्म प्रणाली देखील निष्क्रीय होती. विशेष म्हणजे, आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग (Emergency Exit) पूर्णपणे ब्लॉक आणि बंदिस्त ठेवण्यात आला होता, तसेच अग्निशमन उपकरणांच्या देखभालीबाबतही मोठा फेरफार व त्रुटी आढळल्या.
याशिवाय, रासायनिक पदार्थांच्या साठवणुकीच्या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेही नियम पाळण्यात आले नव्हते. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी आवश्यक क्रमांक दर्शनी भागात उपलब्ध नव्हते आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या साठवणुकीतही सुरक्षेचा अभाव दिसून आला.
या सर्व गंभीर त्रुटींच्या आधारे, महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ मधील कलम ३, ४, ६, ७, ८ आणि ३६ अन्वये चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ०५९/२०२६ (दिनांक २४ सप्टेंबर २०२६) नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

