Chandrapur News: साहेब होण्याचे स्वप्न अधुरेच!

Bhairav Diwase
नाथजोगी समाजातील जीवनची जीवनज्योत विझली

शतकानुशतके भटकंतीचे जीवन जगणाऱ्या नाथजोगी समाजातील एका कुटुंबाने आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहिले होते. मुलाने शिकावे, मोठे अधिकारी व्हावे आणि आयुष्यात साहेब बनून कुटुंबाचे दिवस बदलावेत, हीच आई-वडिलांची अपेक्षा होती. मात्र, अवघ्या बाराव्या वर्षी जीवन विलास झरेकर याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या कुटुंबाच्या स्वप्नांचा आधारच हरपला आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जीवन विलास झरेकर (वय १२, रा. खांबाडा, ता. राजुरा) हा विसापूर येथील सन्मित्र सैनिक स्कूलमध्ये सहाव्या वर्गात शिक्षण घेत होता. खेळ आणि इतर सहशालेय उपक्रमांमध्ये तो हुशार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मुलाच्या प्रगतीबद्दल आई-वडिलांच्या मनात मोठ्या अपेक्षा होत्या. शिक्षणाच्या बळावर मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल, या आशेने त्यांनी त्याला सैनिकी शाळेत दाखल केले होते.


गुरुवारी वडील विलास झरेकर यांनी जीवनला शाळेत सोडले. मुलाचा निरोप घेऊन ते आपल्या खांबाडा येथील घरी परतत होते. गावात पोहोचण्याच्या आधीच शाळेतील एका शिक्षकाचा त्यांना फोन आला. जीवनची प्रकृती बिघडली असून त्याला चंद्रपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांतच जीवनच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. अर्ध्या तासापूर्वी आपल्या मुलाला शाळेत सोडून आलेल्या वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या मुलाच्या भविष्याची स्वप्ने ते पाहत होते, त्याच मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकण्याची वेळ त्यांच्यावर आली.


जीवनच्या मृत्यूचे नेमके कारण काय, त्याच्या मृत्यूपूर्वी शाळेत कोणत्या घडामोडी घडल्या आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी कोणती वैद्यकीय मदत देण्यात आली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.


शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून प्राथमिक स्तरावर आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात असल्याचा दावा केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचेही सांगितले जात आहे. कुटुंबीयांनी घातपात झाल्याचा आक्रोश करीत आहेत मात्र जीवनच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवाल आणि निष्पक्ष तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.


एका जीवनाचा अंत, व्यवस्थेला अस्वस्थ करणारे प्रश्न:

नाथजोगी समाजातील कुटुंबांसाठी शिक्षण हे सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलण्याचे महत्त्वाचे साधन आहे. अशा परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा शाळेत असताना झालेला मृत्यू अनेक प्रश्न उपस्थित करतो. या घटनेत नेमके काय घडले, याची सत्यता समोर येणे आणि कुटुंबाला न्याय मिळणे हीच आता महत्त्वाची बाब आहे. जीवनच्या मृत्यूमागील परिस्थितीची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


एका वडिलांनी मुलाला शिकवून 'साहेब' बनविण्याचे स्वप्न पाहिले होते; मात्र त्या स्वप्नाचा आधार असलेला जीवनच हरपल्याने झरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


सन्मित्र सैनिकी शाळा व्यवस्थापनाने जीवनच्या मृत्यूचे कारण कुटुंबातील सदस्यांसमोर स्पष्ट केले नाही. एवढेच नव्हे तर जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते तिथून काही वेळातच निघून गेले. दवाखान्यात जीवनचा मृतदेह पाहू देण्यासाठी कुटुंबीयांना पोलिस व रुग्णालय प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आला असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.


जीवनच्या न्यायासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनासाठी एकवटले. आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे. आंदोलनामध्ये संजय कदम, राजु झोडे, बेबीताई उईके, संदिप गिऱ्हे, जितेश कुळमेथे यांनी भेट दिली......