चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दीपावली स्नेहमिलन आणि उत्कृष्ट वृत्तांत स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मनस्वी गिऱ्हे यांनी हे सूचक विधान केले.
पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर बोलताना त्यांनी, "आपल्या आशीर्वादाने येत्या काही महिन्यांतच मी चंद्रपूर महानगरपालिकेची महापौर बनणार आहे," असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महापौरपदाच्या राजकीय समीकरणांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये महापौरपदासाठी सव्वा-सव्वा वर्षांचे सूत्र ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेनुसार सुरुवातीचे सव्वा वर्ष भाजपचा, तर त्यानंतरचे सव्वा वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महापौर असणार असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्यास महापौरपदाच्या निवडणुकीतील संख्याबळाचे गणित बदलू शकते. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेला मोठी जुळवाजुळव करावी लागू शकते.
अशा परिस्थितीत मनस्वी गिऱ्हे यांचा महापौरपदाबाबतचा दावा किती महत्त्वाचा ठरणार? भाजप-शिवसेनेचे सव्वा-सव्वा वर्षांचे सूत्र प्रत्यक्षात उतरणार का? की काँग्रेसच्या एकत्र येण्याने संपूर्ण राजकीय गणित बदलणार? याकडे आता संपूर्ण चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.
महापौरपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, हे आगामी राजकीय घडामोडींनंतरच स्पष्ट होणार आहे.


