चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोटगाव येथे सार्वजनिक कार्यक्रमानंतर उरलेले शिळे अन्न खाल्ल्याने तब्बल १३ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोटगाव येथे सार्वजनिक कार्यक्रमानंतर उरलेले अन्न खाल्ल्यानंतर काही नागरिकांना उलट्या, जुलाब आणि तापाचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने बाधित रुग्णांनी जांभूळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. रुग्णांच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी सर्व १३ रुग्णांना पुढील उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले.
उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अश्विन अगळे यांच्या माहितीनुसार, सर्व रुग्णांना रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून उपचार सुरू करण्यात आले आहेत. डॉक्टर आणि परिचारिका रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, उपचार घेत असलेल्या १३ रुग्णांपैकी १० जणांची प्रकृती सुधारली असून, तिघांना अद्याप तापाचा त्रास आहे. या तिघांसह सर्व रुग्णांवर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

