law College : 'मन की बात' ऐकण्याची विद्यार्थिनींना सक्ती? गैरहजर राहिल्यास दंडाचा इशारा!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमावरून नवा वाद निर्माण झाला आहे. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यास दंड ठोठावण्याचा इशाराही देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील सूचना पत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

चंद्रपूर येथील सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता 'मन की बात' कार्यक्रमाचे विशेष प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे.


या कार्यक्रमासाठी शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनींची उपस्थिती अनिवार्य असल्याचे लेखी सूचनेत नमूद करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या गणवेशात उपस्थित राहावे, असेही सूचित करण्यात आले आहे. कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिल्याचा दावा केला जात आहे.


या सूचना पत्रकामुळे विद्यार्थिनींना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सक्ती केली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला असून, या प्रकारामुळे चंद्रपुरात नवा वाद निर्माण झाला आहे.


महाविद्यालयाचा खुलासा :

दरम्यान, या प्रकरणावर शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पूर्णेंदू कार यांनी खुलासा केला आहे. 'मन की बात' कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थिनींवर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही. विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित राहत नसल्यामुळे अशा सूचना द्याव्या लागतात. तीन दिवसांपूर्वी सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष महाविद्यालयात येऊन गेले होते. त्यानंतर विद्यार्थिनींना कार्यक्रमाच्या उपस्थितीबाबत कळविण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले.


एकीकडे महाविद्यालयाकडून सक्ती नसल्याचा दावा केला जात आहे, तर दुसरीकडे उपस्थिती अनिवार्य असल्याचे आणि अनुपस्थित राहिल्यास दंडाचा इशारा दिल्याचे नमूद असलेले पत्रक चर्चेत आले आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमक्या सूचना काय होत्या आणि विद्यार्थिनींच्या उपस्थितीबाबत कोणती भूमिका घेतली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.