Chandrapur News : मंत्री बावनकुळेंच्या 26 मिनिटांच्या भाषणात 33 वेळा आमदार किशोर जोरगेवारांचे नाव!

Bhairav Diwase


चंद्रपूर:-
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रपुरात आलेले राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाषणात आमदार किशोर जोरगेवार यांचा विशेष उल्लेख पाहायला मिळाला. 


भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने महेश भवन येथे आयोजित पदवीधर संवाद मेळाव्यात मंत्री बावनकुळे यांनी 26 मिनिटांच्या भाषणात तब्बल 33 वेळा आमदार किशोर जोरगेवार यांचे नाव घेत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. पदवीधर निवडणुकीच्या प्रचारसभेत स्थानिक आमदाराच्या कामाचा वारंवार उल्लेख झाल्याने या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.


मुख्यमंत्र्यांची मध्यरात्रीही स्वाक्षरी घेऊन जनहिताची कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणारे आमदार, अशा शब्दांत मंत्री बावनकुळे यांनी आमदार जोरगेवार यांच्या कार्यशैलीचे वर्णन केले. जनतेच्या हिताची पत्रे आणि कामे मार्गी लागल्याशिवाय पाठपुरावा थांबवत नाहीत, असे सांगत त्यांनी जोरगेवार यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले. विषयांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची वृत्ती आणि जनतेच्या प्रश्नांबाबतची तळमळ यामुळेच ते कर्तृत्ववान आमदार आहेत, असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.


पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यात सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासोबतच आमदार जोरगेवार यांच्या कार्याचा झालेला वारंवार उल्लेख लक्षवेधी ठरला. महसूलमंत्र्यांनी आपल्या भाषणात जोरगेवार यांच्या कामाची दखल घेत त्यांच्याविषयी व्यक्त केलेला विश्वास हा या कार्यक्रमातील चर्चेचा महत्त्वाचा विषय ठरला


विशेष म्हणजे, चंद्रपूरच्या आगामी राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू असताना मंत्री बावनकुळे यांनी आमदार जोरगेवार यांच्या कार्याचे केलेले हे जाहीर कौतुक महत्त्वाचे मानले जात आहे. 26 मिनिटांच्या भाषणात 33 वेळा नाव घेतल्याचा हा तपशील पदवीधर संवाद मेळाव्याचे राजकीय वैशिष्ट्य ठरला आहे.