Pombhurna News : शेतातील पाण्यावरून सख्ख्या भावांमध्ये वाद; लहान भावाला मारहाण

Bhairav Diwase

पोंभूर्णा:-
शेतातील विहिरीच्या पाण्याचा वापर करण्यावरून सख्ख्या भावांमध्ये वाद झाल्याची घटना तालुक्यातील देवाडा खुर्द येथे घडली. या वादादरम्यान मोठ्या भावाने मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप लहान भावाने केला आहे. याप्रकरणी पोंभूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याची माहिती आहे. सदर घटना दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. 


दिवाकर हे शेतातील धान पिकाला पाणी देत असताना त्याचे मोठे भाऊ देविदास धर्मा थेरकर तेथे आले. विहिरीतील पाणी धान पिकासाठी वापरण्यावरून त्यांनी जाब विचारला. त्यातून दोघांमध्ये वाद झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या वादादरम्यान देविदास यांनी विळ्याने हाताच्या कोपऱ्याजवळ मारून दुखापत केल्याचा, तसेच खाली पाडून हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप दिवाकर यांनी केला आहे. याशिवाय शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.


दरम्यान, शेजारील शेतातील मनोज देऊरमल्ले यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांमधील वाद मिटविल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर दिवाकर यांनी उपचार घेत पोंभूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


या प्रकरणी पोंभूर्णा पोलिसांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नरेश निमगडे करीत आहेत.