Chandrapur News : चंद्रपुरातील चार हॉटेलचे परवाने निलंबित; FDA ची कारवाई!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यातील हॉटेल आणि नाष्टा सेंटर चालकांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अस्वच्छ स्वयंपाकघर, गंजलेले फ्रीज आणि शाकाहारी-मांसाहारी पदार्थांसाठी एकाच तंदूरचा वापर होत असल्याचे धक्कादायक प्रकार तपासणीत समोर आले आहेत. या कारवाईत चंद्रपूर शहर आणि भद्रावती तालुक्यातील चार आस्थापनांचे परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. 


चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल चालकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या अचानक तपासणीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. काही ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी एकाच तंदूरचा वापर केला जात होता. तर स्वयंपाकघरात अन्नकचरा, भिंती आणि चिमणीवर तेलाचे चिकट थर साचलेले होते. इतकेच नाही, तर अन्नपदार्थ साठवण्यासाठी वापरण्यात येणारे फ्रीज गंजलेल्या अवस्थेत आढळले. भांडी धुणे आणि अन्न तयार करण्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था नव्हती. कर्मचाऱ्यांकडून एप्रॉन आणि हेडगिअरचाही वापर केला जात नव्हता. या गंभीर त्रुटींमुळे अन्न व औषध प्रशासनाने चार आस्थापनांवर कारवाई केली आहे.


यामध्ये तुकूम येथील सुलतान इफहाम बिर्याणी सेंटर, आझाद गार्डनसमोरील मौचक फॅमिली रेस्टॉरंट, भद्रावती तालुक्यातील भामडेळी येथील विर्य वाईल्डलाईफ टूर्स एलएलपी रिसॉर्ट आणि मूल रोडवरील श्रीहरी नाष्टा सेंटर यांचा समावेश आहे.

सहायक आयुक्त प्रवीण उमप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी कुणाल मुळे, उमेश कापगते आणि प्रणय कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

विशेष म्हणजे, एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १५ आस्थापनांचे परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहेत.


हॉटेलमध्ये मिळणारे अन्न स्वच्छ आणि सुरक्षित असणे ही ग्राहकांची अपेक्षा असते. मात्र, तपासणीत समोर आलेल्या या प्रकारांमुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवायला जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.