चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरातील वाहतूक कोंडी आणि रॉग साईडने (चुकीच्या दिशेने) वाहन चालवल्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने एक कठोर पाऊल उचलले आहे.
प्रशासनाने आता या भागात 'रॉग साईड कटर' (Spike Barrier) बसवले आहेत. शॉर्टकटच्या नादात चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांच्या आता चांगलाच चांगभलं होणार असून, यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होऊ शकते.
अनेकदा वाहनचालक घाईगडबडीत किंवा शॉर्टकट मारण्याच्या उद्देशाने विरूद्ध दिशेने गाड्या दामटतात, ज्यामुळे इतरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होतो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी जटपुरा गेट परिसरात हे विशेष कटर कार्यन्वित करण्यात आले आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जर कोणी चुकीच्या दिशेने वाहन नेण्याचा प्रयत्न केला, तर या कटरमधील स्पाईक्समुळे (Spikes) वाहनाचे टायर्स तात्काळ पंक्चर किंवा फाटून मोठे आर्थिक नुकसान होईल. मात्र, वाहतुकीच्या योग्य दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना या कटरचा कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही देखील देण्यात आली आहे.
नियम मोडणाऱ्यांवर केवळ कटरद्वारे होणाऱ्या नुकसानाचीच नव्हे, तर वाहतूक नियमांनुसार कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई देखील केली जाईल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम राबवण्यात आला असून, वाहनचालकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

