मुल:- मुलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मसाला भात वाटपावरून झालेला एक क्षुल्लक वाद इतका विकोपाला गेला की, एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील ताडाळा रस्त्यावर शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
मूल शहरातील घोगरे यांच्या घरी मुलाच्या वाढदिवसानिमित्त मसाला भात वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान विहीरगाव येथील रहिवासी कुणाल भीमानंद चिकाटे (वय २३) आणि पप्पू शामराव मेश्राम (वय २३) यांच्यात भात वाटपावरून शाब्दिक चकमक झाली. उपस्थितांनी मध्यस्थी करून हा वाद कार्यक्रमस्थळीच मिटवला.
मात्र, आरोपी पप्पू मेश्राम याने या वादाचा राग मनात धरला. रात्री ९ वाजताच्या सुमारास कुणाल ताडाळा रस्त्यावरून जात असताना पप्पूने त्याला गाठले आणि त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात कुणाल गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर जखमी कुणालला तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्परता दाखवत आरोपी पप्पू मेश्राम याला बेड्या ठोकल्या आहेत. एका क्षुल्लक वादातून झालेल्या या रक्ताळलेल्या घटनेमुळे मूल परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मूल पोलीस पुढील तपास करीत आहेत.
