Fire News: रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग; तीन बालकांचा होरपळून मृत्यू

Bhairav Diwase
अमरावती:- अमरावती येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाला भीषण आग लागली असून या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


एसएनसीयूमध्ये कमी दिवसांचे कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील सुमारे 50 ते 60 नवजात बालकांवर उपचार सुरू असतात. पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याने विभागात एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळं आगीचा घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. आगीची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तातडीने नवजात बालकांना विभागाबाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली. या दुर्घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाला.


रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही बालकांना पुढील उपचारांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यापैकी चार बालकांवर उपचार सुरू असून, एक बालक गंभीर आहे. या बालकाच्या हाताला आणि पायाला भाजले असून, अन्य तीन बालकांना किरकोळ भाजले आहे. काही बालकांना पीडीएमसी रुग्णालयातही दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिली. दरम्यान, आगीचे नेमके कारण तसेच दुर्घटनेतील नुकसानीचा तपशील तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.