सावली:- घरगुती वादातून एका पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण चिचबोडी गावात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
सावली तालुक्यातील चिचबोडी येथील ५५ वर्षीय मुखरू कवळू मलोडे आणि त्यांचा ३५ वर्षीय मुलगा दिलीप मलोडे यांच्यात गेल्या काही काळापासून घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत होते. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा बापा-लेकात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात मुलगा दिलीप मलोडे याने घरातील काठीने वडील मुखरू मलोडे यांच्यावर हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात मुखरू मलोडे यांचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी घरातील इतर सदस्य गणपतीच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते, त्यामुळे ही दुर्घट घटना उशिरा उघडकीस आली.
माहिती मिळताच सावली पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून, आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास सावली पोलीस करत आहेत.

