लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२४-२५ प्रक्रियेतील मैदानी चाचणीचा निकाल आता जाहीर झाला असून, लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण २१५ पोलीस शिपाई पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये पुरुष, महिला आणि तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे. गेल्या ११ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ही मैदानी चाचणी पार पडली.
महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमानुसार, ज्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवले आहेत, अशा उमेदवारांची प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.
निवड यादी कुठे पाहाल? उमेदवारांना ही यादी www.chandrapurpolice.gov.in या संकेतस्थळावर किंवा पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथील नोटीस बोर्डवर पाहता येईल. https://chandrapurpolice.gov.in/bharti यावर क्लिक करून यादी डाउनलोड करा.
आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया: जर कोणत्याही उमेदवाराला या यादीबाबत आक्षेप किंवा हरकत असेल, तर त्यांनी ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपले म्हणणे लेखी स्वरूपात पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावे.
संपर्क: उमेदवार sp.chandrapur@mahapolice.gov.in या ईमेलवर किंवा ०७१७२-२५१२०० या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
विहित मुदतीनंतर येणाऱ्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी तातडीने आपली नावे तपासून पुढील तयारीला लागण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

