चंद्रपूर:- कोळसा आणि वाघांची भूमी म्हणून ओळखला जाणारा आपला चंद्रपूर जिल्हा आता जागतिक नकाशावर 'विश्वविक्रमांचा जिल्हा' म्हणून उदयाला आला आहे. एकापाठोपाठ एक अशा तीन मोठ्या कामगिरी करत चंद्रपूरने 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे.
पहिला विक्रम घडला २१ जानेवारी २०२४ रोजी. राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चांदा क्लब मैदानावर तब्बल ३३,२५८ दिव्यांच्या साहाय्याने "सियावर रामचंद्र की जय" हा ११ अक्षरी महामंत्र साकारण्यात आला. १०० चौरस फूट जागेत पसरलेल्या या प्रकाशोत्सवामुळे संपूर्ण परिसर राममय झाला होता. या भव्य भक्ती महोत्सवाची दखल थेट गिनीज बुकने घेतली आणि चंद्रपूरला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र बहाल केले.
चंद्रपूरच्या शिरपेचात दुसरा मानाचा तुरा रोवला गेला 'ताडोबा महोत्सवात'. १ मार्च २०२४ रोजी रामबाग परिसरात २६ वेगवेगळ्या प्रजातींच्या तब्बल ६५,७२४ रोपट्यांपासून 'भारतमाता' हा शब्द साकारण्यात आला. वनविभागाच्या या उपक्रमाने केवळ पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला नाही, तर जागतिक विक्रमाची नोंद करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पकतेला जागतिक व्यासपीठ मिळवून दिले.
आणि आता ताजा विक्रम! १ मार्च २०२५ रोजी चंद्रपूरच्या लेकींनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा झेंडा फडकवला. 'उत्कृष्ट महिला मंच' आणि सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या वतीने आयोजित या सोहळ्यात ३००० महिलांनी एकाच वेळी 'लावणी' सादर केली. '२० मिनिटे २० लावण्या' या आव्हानाद्वारे त्यांनी १३२६ महिलांचा जुना रेकॉर्ड मोडीत काढला असून नवीन रेकॉर्ड हा २४३२ झाला आहे. गृहिणींपासून ते विद्यार्थिनींपर्यंत सर्वांच्या एकजुटीने चंद्रपूरचे नाव पुन्हा एकदा जगाच्या ओठावर आले आहे.
एकीकडे आध्यात्मिक ऊर्जा, दुसरीकडे पर्यावरणाचे रक्षण आणि तिसरीकडे महाराष्ट्राची लोककला! या त्रिवेणी संगमामुळे चंद्रपूर जिल्हा आता खऱ्या अर्थाने 'ग्लोबल' झाला आहे. या यशाबद्दल सर्व चंद्रपूरकरांचे आणि आयोजकांचे जगभर कौतुक होत आहे.

