Chandrapur News: होळीच्या रंगात विरघळला दुःखाचा काळ

Bhairav Diwase
वैनगंगा नदीत बुडून तिघांचा मृत्यू!
चंद्रपूर:- एकीकडे संपूर्ण देश रंगांच्या उत्सवात न्हाऊन निघाला असताना, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर मात्र शोककळा पसरली आहे. वैनगंगा नदीच्या शांत दिसणाऱ्या पात्राने तीन तरुणांचा बळी घेतला असून, सणासुदीच्या दिवशी तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुठे पार्टीचा आनंद शोकात बदलला, तर कुठे होळीचा रंग काळा ठरला.


चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव-खरकाडा परिसरात रविवारी सायंकाळी तरुणांनी पार्टीचा बेत आखला होता. शुभम बगमारे आणि शुभम सहारे हे आपल्या मित्रांसह वैनगंगेच्या तीरावर गेले होते. मात्र, जेवण आटोपून आंघोळीसाठी उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोन्ही तरुण खोल डोहात ओढले गेले. सोमवारी दुपारी आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्यांचे मृतदेह बाहेर काढले तेव्हा परिसरात एकच आक्रोश पाहायला मिळाला.


ही घटना ताजी असतानाच, आज मंगळवारी होळीच्या दिवशी गडचिरोलीच्या आरमोरी येथील गायकवाड चौकातील २६ वर्षीय शुभम रामटेके याचाही वैनगंगेतच बुडून मृत्यू झाला. रंग खेळल्यानंतर मित्रांसोबत आंघोळीला गेलेला शुभम गांगलवाडी टी-पॉईंट जवळ बुडाला. एका क्षणाच्या बेसावधपणामुळे आनंदाच्या रंगात दुःखाचा काळा रंग मिसळला गेला.