चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिकेत आज हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने आता टोक गाठले असून, स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांना डावलून गटनेते राजेश अड्डूर यांनी केवळ विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांची नावे दिल्याचा आरोप करत धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी थेट सभात्याग केला.
चंद्रपूर महानगरपालिकेची विशेष सभा आज स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी बोलावण्यात आली होती. सर्वांचे लक्ष काँग्रेस कोणाला संधी देते याकडे लागले होते. मात्र, महापौरांनी जेव्हा काँग्रेसच्या ७ सदस्यांच्या नावांची घोषणा केली, तेव्हा सभागृहात एकच खळबळ उडाली. काँग्रेस गटनेते राजेश अड्डूर यांनी दिलेल्या यादीत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या एकाही समर्थकाला स्थान देण्यात आलेले नाही.
काँग्रेसकडून स्थायी समितीत वर्णी लागलेले ७ सदस्य:
१. वसंता देशमुख
२. सचिन कल्याल
३. राजेश अडूर (स्वतः गटनेते)
४. संजीवनी वासेकर
५. चंदा वैरागडे
६. सोफिया तवंगर
७. विनोद लभाने
या निवडीनंतर धानोरकर गटाचे नगरसेवक आक्रमक झाले. राजेश अड्डूर यांनी लोकशाहीला हरताळ फासत, कोणालाही विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने ही नावे दिली असल्याचा आरोप त्यांनी केला. "पक्षातील निष्ठावंतांना डावलून केवळ एका गटाची हुकूमशाही चालवली जात आहे," असे म्हणत धानोरकर गटाने निषेध व्यक्त केला आणि सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले.
या संपूर्ण प्रकारामुळे चंद्रपूर काँग्रेसमधील 'वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर' हा वाद आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. आगामी काळात या प्रकरणाचे पडसाद वरिष्ठ स्तरावर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

